आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो, असे श्रीमद् भागवतगीतेत म्हटलं आहे. त्यामुळे मन आणि बुद्धी तल्लख, सात्विक आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काय खाता हे महत्त्वाचे असते. रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास अतिशय हानिकारक ठरत आहे. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या यांचे विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व ओळखूनच भारतीय पद्धतीच्या कोणत्याही जेवणात आपल्याला विविध प्रकारच्या कोशिंबीरी पाहायला मिळतात. काय खावे याला अतिशय सोपे उत्तर आहे.
जे ज्या दिवसांत पिकते ते खावे. त्या त्या काळात येणाऱ्या पालेभाज्या, फळं हाच खरा नैसर्गिक आहार म्हणता येईल.
आजारांपासून बचावासाठी आपल्याला नेहमीच भरपूर पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आजारांपासून वाचण्यासाठी पालेभाज्या आपणाला नैसर्गिकरित्या ताकद देत असतात. बऱ्याचशा पालेभाज्या आपणाला आवडत नसतात, परंतु हिवाळ्याच्या हंगामामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचा आहारात समावेश असायला हवा. शरीराची अधिक उष्माकांची गरज भागेल व सर्व पोषक घटक मिळतील, अशा पालेभाज्यांचं सेवन केल्यास त्याचा निरोगी आयुष्यासाठी निश्चितच फायदा होऊ शकतो.
हिवाळ्यात आहारामध्ये आवर्जून खाण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पालेभाज्या व त्यांच्या गुणांविषयी जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही त्यांचे महत्त्व पटेल.

पालक पालेभाजी
हि भाजी पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई यांचा समावेश असतो. हिवाळ्यामध्ये अनेक आजारांपासून वाचण्यासाठी पालक महत्त्वाची भूमिका बजावतो. पालकामध्ये आयर्न, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमसारखे पौष्टिक घटक असतात.
पालकाच्या वेगवेगळ्या डिश तयार करून आहारामध्ये त्यांचा समावेश करू शकतो.

चाकवत पालेभाजी
संपूर्ण भारतभरात हिचे सेवन केले जाते. चाकवताची भाजीही अत्यंत गुणकारी अशी आहे. यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयर्नसारखे पोषक घटक असतात. यात आठ प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. या पालेभाजीत व्हिटॅमिन ए, बी 1 आणि व्हिटॅमिन सी याचा समावेश असतो.

तांदुळशा पालेभाजी
या भाजीत प्रोटीन प्रमाण अधिक असते. तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तांदुळशाच्या भाजीचं सेवन करायला हवं. या पालेभाजीत व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात याचे आर्वजून सेवन करायला हवे.

मेथी पालेभाजी
हि भाजी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भाजी समजली जाते बाराही महिने उपलब्ध असते. न्यूट्रिशनने परिपूर्ण असणारी मेथी डायबिटीसमध्ये फायदेशीर ठरते.
डायजेशनसाठी उपयोगी असते. कॅलरीज खूप कमी असतात. केसांना लांबसडक आणि चमकदार बनवते
हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर असते.

गाजर
हे पौष्टिक घटकांचा खजिना आहे. हिवाळ्यात गाजराचा आहारात समावेश करायला हवा. यात व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि आयर्नसारखे घटक आहेत.
सलाड म्हणूनही गाजराचे सेवन नियमित करायला हवे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते.

बीट
हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. फळ आणि भाजीपाला या दोन्हींमध्ये बीटरूटचा समावेश होतो. आरोग्यासाठी बीट अत्यंत गुणकारी आहे. वजन कमी करायचे असेल तर याची चांगली मदत होऊ शकते.
यात सोडियम, पोटॅशियम, फायबरसारखे पोषक घटक आढळतात. रक्ताची कमतरता असेल तर याचे सेवन आर्वजून करायला हवे.
चांगला आहार कोणता तर ज्यात पोळी, भाकरी, रोटी, भात यांचे प्रमाण कमी आणि पालेभाज्या जास्त असते तो.
मग वाढवताय ना जेवणात भाज्या!