Nag Panchami भारतात विविध सण साजरे केले जातात त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. पौराणिक कथांमध्ये नागाला विशेष स्थान आहे. सापांचा देव शेष नाग यांच्या सन्मानार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात नागपंचमी साजरी केली जाते आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
Nag Panchami नागपंचमी सणाविषयी माहिती
श्रावण महिन्यात ५ व्या दिवशी म्हणजेच श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागांना आणि इतर सापांना दूध दिले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषानुसार नाग देवता पंचमी तिथीचा निवासी स्वामी आहे आणि भगवान शंकराच्या मानेवर ठेवलेल्या नागांची पूजा या दिवशी करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणु नये, शेतामध्ये नांगर चालवु नये असेही म्हणले जाते.
नागपंचमीच्या दिवशी जिवंत सापांची पूजा केली जाते कारण लोक त्यांना नाग देवतांचे प्रतिनिधी मानतात.
अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
— (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)
Nag Panchami सणाविषयी काही पौराणिक कथा
नागपंचमी Nag Panchami सणाविषयी काही पौराणिक कथा सांगितल्या आहेत त्यामधील काही कथा खाली दिलेल्या आहेत.
Nag Panchami पहिली कथा
नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मरण पावली. काही वेळाने नागीण तिथं आली.आपलं वारूळ पाहू लागली. तर तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.
तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली.
मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस? तुझे आई-बाप कोठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले.
ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही.तिने मुलीला सारी हकिकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले. ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळयांना आनंद झाला.
तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेंव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला.
कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो.
नक्की वाचा: दसरा किंवा दसरा सण का साजरा केला जातो?
Nag Panchami दुसरी कथा
एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नाग देवाता, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसे तिला नागदेवता प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो.
नक्की वाचा: गणेशोत्सव कसा साजरा करायचा?
श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नवनागांच्या आकृत्या काढतात. त्यांना हळदकुंकू वाहून पूजा करतात. नंतर दूध- लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

नागपंचमीच्या दिवशी सापाला मिळणारे महत्व जाणुन काही लोकांनी त्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. साप दुध पित नाही काही दिवसांनी हे साप मृत्युमुखी पडतात. सरकारने नागपंचमीच्या दिवशी ’नागोबाला दुध’ म्हणत फिरणार्या लोकांवर बंदी घातली. सर्पमित्रांनी अश्या अनेक सापांची सुटका केली आणि त्यांना परत अरण्यात सोडुन दिले.
खरे साप उपलब्ध नसले तर बहुतेक ठिकाणी नागदेवतेच्या प्रतिमेची पुजा केले जाते. दुध, भाजलेले चणे, भात, लाह्या वगैरेंचा नैवेद्य दाखवला जातो. दुध, भाजलेले चणे, भात आणि लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.